शिवसेनेने काँग्रेससोबतची युती तोडण्याचे आदेश तरीही जिल्हा परिषदेत ‘गळ्यात गळा’

Foto

औरंगाबाद: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजप या पक्षांनी आपसातील मतभेद बाजूला सारून समेट घडवून आणला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थामधील शिवसेनेने आपली काँग्रेससोबत असलेली युती तोडावी, असे ठरले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेत मात्र या आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा दाखवण्यात आल्या. जिल्हा परिषदेतील शिवसेना व काँग्रेस सदस्य आपली युती अबाधित ठेवून सत्तेची समसमान फळे चाखत आहेत. 

याउलट शिवसेना आणि भाजप पदाधिकारी व सदस्यांमध्ये काम वाटपावरुन सतत धुसफूस दिसून येते. विरोधी पक्ष व गटनेते यांनी वेळोवेळी एकमेकांवर आक्षेप नोंदवले आहेत. बांधकाम सभापती विलास भुमरे हे विकास कामांचा अधिकचा वाटा शिवसेना सदस्यांच्या गटात देतात व आमचा दुजाभाव करतात. यामुळे भाजप सदस्याच्या गटातील मतदार त्यांना जाब विचारतात. त्यावेळी आम्ही निरुत्तर होतो, असे भाजपचे गटनेते शिवाजी अण्णासाहेब पाथ्रीकर यांचे म्हणणे आहे. दरेगाव गटाचे भाजप सदस्य एल.जी. गायकवाड यांनी तर विकास कामातील समान वाटा न दिल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभेतून भाजप सदस्यांसह सभागृह सोडले होते. खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथील भाजप सदस्य सुरेश सोनवणे हे शिक्षण व क्रिडा समितीचे सदस्य आहेत ते प्रत्येक मासिक बैठकीत आपल्या खुलताबाद तालुक्यात निवडून आलेले तीनही सदस्य भाजपचे आहे. म्हणुन विकासकामे तसेच शिक्षण विभागामार्फत उदासिनता दाखवली जाते अस आरोप करतात.  

विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड. देवयाणी डोणगावकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 21 सप्टेबर 219 रोजी संपत आहे. त्यानंतर अध्यक्षपदी कोणी विराजमान होणार यावरुन शिवसेना भाजप सदस्यांमधील संबंध अधिक तानले जाण्याची शक्यता आहे. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर या दोन पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांवर बरेच काही अवलंबून आहे. यांच्या एकमेकांच्या संबंधावर विधानसभा उमेदवाराचे भवितव्य अवलंबुन आहे.